पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा हाहाकार सुरूच असून, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच दोन दिवसांत 1940 जणांना करोनाची बाधा झाले आहे. मयत झालेल्यांपैकी 44 जण शहरातील रहिवाशी असून, एक जण शहराबाहेरील आहे. त्यामुळे एकूण मयतांची संख्या 751 इतकी झाली असून, बाधितांची संख्या 35 हजार 397 वर पोहोचली आहे.
शनिवारी (दि. 15) 968 जणांना करोनाची बाधा झाली होती. यामध्ये शहरातील 963, तर शहराबाहेरील 15 जणांचा समावेश होता. तर शनिवारी एकाच दिवसात 20 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 19 जण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशी असून, शहराबाहेरील खेड तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी दाखल झालेल्या संशयीतांचे आज (रविवारी) महापालिकेला अहवाल प्राप्त झाले.
या अहवालानुसार रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 950 जणांना तर शहराबाहेरील 12 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर आजच्या एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण महापालिका हद्दीतील रहिवाशी होते. आजच्या मयतांमध्ये दिघी येथील एका 24 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 24 हजार 981 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 1428 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 604 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2511 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 1685 जण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5204 आणि शहराबाहेरील 445 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.