धारावीच्या विकासासाठी रेल्वेकडून 45 एकर जमीन 

नवी दिल्ली – आशिया खंडातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी रेल्वे मंत्रालयाने आपली 45 एकर जमीन 99 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची ही जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आज यश आले आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धारावी या झोपडपट्टला लागून असलेली रेल्वेची 45 एकर जमीन धारावीच्या विकासासाठी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जागा मिळविण्यासाठी रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. देशाला झोपडपट्टीमुक्त बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे. हेच स्वप्न साकार करण्यासाठी फडणवीस प्रयत्न करीत होते. आता रेल्वेने 45 एकर जागा 99 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

धारावी झोपडपट्टीला लागून रेल्वेची ही 45 एकर जागा आहे. रेल्वेकडून सध्या या जागेचा वापर होत नाही. यामुळे धारावीच्या विकासासाठी ही जागा दिली जात आहे. ही जागा मिळाल्यामुळे महाराष्ट्र सरकार धारावीचा विकास उत्तमप्रकारे करू शकेल आणि धारावीकरांच्या जीवनात मोठा बदल येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे, आपण सायनमध्ये लहानाचे मोठे झाल्यामुळे धारावीशी रोजचा संबंध आला आहे. आता रेल्वे मंत्री म्हणून धारावीच्या विकासासाठी ही जागा देताना शेजारवासीयांचे कर्ज फेडल्यासारखे वाटत असल्याची भावना गोयल यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.