पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 44 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत, तर चिकुनगुनियाचे 2 संशयित रुग्ण आढळले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार कीटकजन्य आजारांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. या महिन्यामध्ये 8 हजार 546 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या 531 संशयित रुग्णांपैकी 44 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले. तर चिकुनगुनियाचे दोन संशयित रुग्ण आढळले आहे. यावर्षात आतापर्यंत डेंग्यूच्या 1 हजार 110 संशयित रुग्णांपैकी 121 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे.
अनेक ठिकाणी रोगांना आमंत्रण देणारी अस्वच्छता व त्यामुळे अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाणी तुंबल्यामुळे दलदल, त्यामुळे डासांची होणारी उत्पत्तीही साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरते. तसेच अशुद्ध, प्रदूषित हवा या परिस्थितीत भर घालते परिणामी या महिन्यात कीटकजन्य आजार आणि साथीच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. सध्या महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूूचे रुग्ण उपचार घेत आहेत.