मुंबई – करोना संपुष्टात येण्याबरोबरच घरासाठीच्या कर्जावरील व्याज दर कमी असल्यामुळे ग्राहकाकडून घर खरेदी होत आहे. व्याजदर कमी असल्यामुळे विकासकाकडून घरांची निर्मिती आणि पुरवठा वाढू लागला आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत भारतातील सहा मोठ्या शहरात 80,000 नवी घरे विकासकाकडून उपलब्ध करण्यात आली. त्या अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत घर निर्मितीत 43 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.
तंत्रज्ञानावर आधारित घर विक्रीसाठी मदत करणाऱ्या स्क्वेअर यार्ड या संस्थेने सहा मोठ्या शहरातील घर निर्मितीची आकडेवारी संकलित केली आहे. या आकडेवारीनुसार निवासी घरासाठीची मागणी वाढल्यामुळे निवासी घर निर्मिती जास्त प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात आले.
पुण्यासह हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, नोयडा, गुडगाव या शहरांचा या आकडेवारीसाठी उपयोग करण्यात आला आहे. नवीन वर्ष विकसकासाठी निर्मिती आणि विक्रीच्या दृष्टीकोनातून सकारात्मक सुरू झाले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. करोनानंतर बऱ्याच नागरिकांमध्ये स्वतःचे घर असावे अशी भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे गुंतवणुकीसाठी नाही तर राहण्यासाठी घरांची खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे. या तिमाहीत एकूण घर निर्मितीत मुंबईचा वाटा सर्वात जास्त म्हणजे 35 टक्के आहे. हैदराबादचा वाटा 25%, पुण्याचा 17 टक्के, बंगळुरूचा 16 टक्के, गुडगावचा पाच टक्के, नाएडाचा दोन टक्के असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एकूण घर निर्मिती आणि खरेदीमध्ये छोट्या घरांचा वाटा अजूनही जास्त असल्याचे दिसून येत आहे. दोन बेडरूम हॉल किचन घरासाठी चौकशी 42 टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून येते. मात्र तीन बेडरूम हॉल किचनसाठीची चौकशी बरीच कमी झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये व्याजदर कमी असल्यामुळे आणि ते वाढण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी घर खरेदीचे निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्यातही घरखरेदी वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्यानंतर घराच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.