अमरावती – काल रात्रीपासून आंधप्रदेशात तब्बल 43 नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या 87 झाली आहे. या नव्याने सापडलेल्या साऱ्या केसेस तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या आहेत.
या राज्याच्या पश्चिम गोदावरील जिल्ह्यात आत्तापर्यंत एकही करोनाचा नवीन रुग्ण आढळून आला नव्हता; पण मंगळवारी एकाच दिवसात तिथे 13 रुग्ण आढळून आले आहेत. तर कडाप्पा जिल्ह्यात 15 रुग्ण आढळून आले आहेत. चित्तुर आणि प्रकाशम जिल्ह्यातीलही प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले असून पूर्व गोदावरी, नेल्लोर जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि कृष्णा, विशाखापट्टणम जिल्ह्यात प्रत्येकी एक करोना रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारी रात्रीपासून 373 संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले त्यातील 330 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.