दोन गृहनिर्माण संस्थेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी – वाकड येथील इशान आणि अंकित या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीच सभासदांची 43 कोटी 26 लाख 32 हजार 570 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपहार पदाधिकाऱ्यांनी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला आहे. संस्थेच्या लेखा परीक्षणादरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सहाकारी संस्थेचे लेखा परीक्षक राजेश सुदाम भुजबळ (वय 52) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजीव यशवंत भाले (रा, शिवाजीनगर), सुहास भालचंद्र गोसावी (रा. औंध), अंजली शशांक निवसरकर (रा. औंध), भालचंद्र चिंतामण देव (रा. वाकड), ईश्वर खुशालदास पंजाबी (लक्ष्मीरोड, पुणे) या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे ईशान आणि अंकित अशा दोन सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. दोन्ही गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी म्हणून पाचही आरोपी काम
पाहत होते.
आरोपींनी आपसात संगनमत करून 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2013 या दरम्यान गृहनिर्माण संस्था आणि प्लॉटधारक सभासदांचा विश्वास संपादन करून 43 कोटी 26 लाख 32 हजार 570 रुपयांचा अपहार केला. जिल्हा उपनिंबधक कार्यालयातून या गृहनिर्माण संस्थांचे फेर लेखापरीक्षण केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नसून अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.