हैद्राबाद विमानतळावर एका इसमास ४३.५५ लाखांच्या सोन्याची तस्करी करताना सीमाशुल्क विभागाने जेरबंद केले आहे. शारजाह येथून हैद्राबाद विमानतळावर दाखल झालेल्या या व्यक्तीकडून ८९५.२० ग्राम सोने जप्त करण्यात आले. पकडले जाऊ नये यासाठी या व्यक्तीने सोन्याची पेस्ट प्लॅस्टिक पुड्यांमध्ये भरून अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवली होती. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सोने व इतर मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून नवनवीन क्लुप्त्या वापरण्यात येत असल्याचं सीमाशुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी केरळ विमानतळावर १४ लाख किमतीचे सोने पकडण्यात आले होते.
यावेळी तस्कराने सोन्याची पेस्ट परिधान केलेल्या पॅन्टच्या दोन थरांमध्ये लपवले होते. जुलै महिन्यामध्ये दुबई येथून आलेल्या एका तस्कराने ८१० ग्रॅम सोने आपल्या गुदाशयामध्ये लपवून आणले होते. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.
दरम्यान, सीमाशुल्क विभागाच्या नियमांनुसार एक वर्षाच्या कालावधीपेक्षा अधिक काळ भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांना देशामध्ये येताना दागिन्यांच्या स्वरूपात सोने आणण्याची सशर्त परवानगी आहे.
यामध्ये पुरुषांसाठी जास्तीत जास्त २० ग्रॅम अथवा ५० हजारापेक्षा कमी किमतीचे तर स्त्रियांसाठी ४० ग्रॅम अथवा १ लाखापेक्षा कमी किमतीचे सोने आणण्याची मुभा आहे.