पुणे- गेल्या साडेतीन वर्षांत शहरातील 42 हजार ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेच्या “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मोफत आरोग्य तपासणी योजने’चा लाभ घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर येते आहे. या योजनेसाठी दरवर्षी 90 लाख रुपयांची तरतूद केली जात असून, दरमहा एक हजारांहून अधिक नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. एमआरआय, सीटी-स्कॅनसह 250 हून अधिक चाचण्यांचा या योजनेत समावेश असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
स्थायी समितीचे अध्यक्ष असताना 2017 मध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्वप्रथम या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर 2018-19 पासून “पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप’ (पीपीपी) तत्त्वावर मोफत आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. महापालिकेच्या दोन प्रमुख रुग्णालयांसह सर्व प्रसूतिगृहे व बाह्यरुग्ण विभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय व कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार दवाखाना येथे प्रमुख वैद्यकीय चाचण्यांसह डिजिटल एक्स-रे, सिटी स्कॅन व एमआरआय इत्यादी चाचण्याही मोफत केल्या जातात. याव्यतिरिक्त आंबिल ओढा, औंध, बोपोडी, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, मुंढवा, पाषाण, भवानी पेठ, वानवडी, येरवडा, गुरुवार पेठ, कोंढवा, शुक्रवार पेठ, दीप बंगला चौक येथील महापालिकेची प्रसूतिगृहे व सर्व बाह्यरुग्ण विभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा दिली जाते.
या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक तपासण्या करायच्या असतील, त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) सादर केल्यानंतर सर्व तपासण्या मोफत केल्या जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयांत सीटी-स्कॅन सुविधा पुरविण्यासाठी”क्रस्ना डायग्नोस्टिक्स लि.’ या नामांकित खासगी संस्थेसोबत महापालिकेने मोफत तपासण्यांसाठी दहा वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या चाचण्यांच्या दरांवर सहा टक्क्यांची सवलत महापालिकेस मिळते.
आरोग्य चाचण्या वेळेत करून घेण्याला अपार महत्त्व आहे. विशेषत: ज्येष्ठांसाठी याचे महत्त्व निर्विवाद आहे. परंतु चाचण्यांसाठी येणारा खर्च करणे परवडत नाही आणि आरोग्याची आणखी हेळसांड होते, ही समस्या लक्षात घेऊन मोफत आरोग्य चाचण्यांची योजना अस्तित्वात आली. त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होत आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर