गेल्या 24 तासांत करोनाचे तीन बळी : मृतांची संख्या 55 वर
पुणे – मागील 48 तासांमध्ये काहीसा शांत झालेला मृत्यूचा कहर पुन्हा सुरू झाला. गेल्या 24 तासांत शहरात करोनाने तिघांचा बळी गेला असून, ससून रुग्णालयासह दीनानाथ आणि कमांड हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 55 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून, दिवसभरात 42 नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
ससून रुग्णालयात दि. 19 एप्रिल रोजी कोंढवा परिसरातील 57 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना करोनासह अन्य आजार असल्यामुळे सोमवारी (दि.20) रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 51 वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि.21) मृत्यू झाला. त्यांना 19 तारखेला रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय महिलेवर पुण्यातील कमांड रुग्णालयात करोनावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पिंपरी-चिंचवड शहरातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
गेल्या 24 तासांत पुणे शहरात नवीन 42 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. सद्य:स्थितीत नायडू, ससून रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांत एकूण 464 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.