पुणे – शहरातील करोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दररोज 40च्या पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही संख्या कमी करण्यात प्रशासनाला अद्याप यश येत नसल्याचे दिसून येते.
शहरात आजही नव्याने 1 हजार 512 बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 328 बाधित करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात 42 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
मागील आठ दिवसात शहरातील बाधित संख्या कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, नमुने तपासणी संख्या एक ते दीड हजारांनी कमी झाल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे.
गुरुवारी (दि. 24) दिवसभरात 5 हजार 642 संशयितांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत तब्बल 5 लाख 94 हजार 949 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 37 हजार 330 जणांना करोनाची लागण झाली आहे.
त्यातील 1 लाख 16 हजार 626 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 449 बाधित सक्रिय असून, त्यातील 957 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 499 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 458 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.