जीवनावश्यक वस्तू, औषधे मिळणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने पुढील तीन दिवस शहरातील व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या महासंघाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. दि.17 ते 19 मार्चदरम्यान शहरातील घाऊक, किरकोळ व्यापार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आला आहे. बंदमधून जीवनावश्यक वस्तू व औषधांना वगळण्यात आले आहे. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन दि. 19 मार्च रोजी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीत सराफ, होजिअरी, कापड, ऑटोमोबाइल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस, मेटल पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक ऍन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डिंग, कॉम्प्युटर, टॉइज, वॉच, सायकल, कर्वे रोड केमिकल, रविवार पेठ, व्यापारी आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे व्यापारी महासंघांतर्गत विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या 82 संघटना सभासद आहेत. शहरातील 40 हजार दुकाने तीन दिवस बंद राहणार आहेत. बैठकीप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, वरिष्ठ, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.