400 तालिबानींची अफगाणिस्तानच्या कैदेतून सुटका

शांतता प्रक्रियेसाठी अफगाण परिषदेचा निर्णय

काबुल – अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रिया सुरळीत सुरू व्हावी यासाठी अफगाणिस्तानमधील पारंपारिक अफगाण परिषदेने 400 तालिबानींची सुटका करण्यास मंजूरी दिली आहे. या तालिबानींची सुटका झाल्यावर आता अफगाण सरकार आणि तालिबानींमधील चर्चेला प्रारंभ होऊ शकणार आहे. 

तालिबानी कैद्यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी आणि शस्त्रबंदी लागू करून शांतता चर्चेला प्रारंभ करण्यात यावा, असे अफगाण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे. अफगाणिस्तानची राष्ट्रीय भाषा असलेल्या पश्‍तो आणि फारसी अशा दोन्ही भाषांमध्ये या संदर्भातील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

या कृतीमुळे अमेरिकेला आपल्या सैन्याचा अफगाणिस्तानमधील आपला प्रदीर्घ मुक्कम हलवण्याची वेळ जवळ आली असल्याचे संकेत मिळाले आहेत. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील वाटाघटी सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. मात्र ही चर्चा पुढील आठवड्यापासून लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मध्य पूर्वेतील कतारमध्ये ही चर्च होण्याची शक्‍यता आहे. कारण तेथेच तालिबानचे राजकीय मुख्यालय असल्याचे मानले जात आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये फेब्रुवारीमध्ये झालेल्या करारानुसार अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये चर्चेला सुरुवात होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी अफगाणिस्तान सरकारने दशकभरापासून सुरू असलेला संघर्ष संपवण्याच्यादृष्टीने सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. 

अफगाणचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी या निर्णयाबद्दल अफगाण परिषदेच्या प्रतिनिधींचे कौतुक केले आणि तालिबान्यांना लढाई थांबवण्याचे आवाहन केले. तर हा निर्णय म्हणजे चांगले, सकारात्मक पाऊल आहे. तालिबानच्या कैद्यांची सुटका झाल्यानंतर एका आठवड्यात वाटाघाटी सुरू होऊ शकतात, असे तालिबानचे राजकीय प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.