पुणे – शहरात धुमाकूळ घालणाऱ्या सराईत सोनसाखळी चोरास विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांना चकवा देण्यासाठी हा गुन्हेगार सातत्याने चोरीच्या वाहनांची अदलाबदल करत होता. तर सीसीटीव्हीत सापडू नये म्हणून तो गल्ली-बोळांचा वापर करत होता. मात्र, पोलिसांनी सलग दीड महिने 300 सीसीटीव्हींच्या फुटेजच्या तब्बल 300 तासांचे रेकॉर्डिंग तपासत त्याचा माग काढला. यासाठी त्यांना तब्बल 400 किलोमीटर फिरावे लागले. ठिकाणा कळताच फिल्मीस्टाइल पाठलाग करुन आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.
रुपेश यादव (36, रा. आनंद पार्क, वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे चार आणि सोनसाखळी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले. चोरीच्या वाहनांची किंमत 4 लाख 75 हजार, तर दागिन्यांची किंमत 3 लाख 90 हजार असा 8 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये दि.24 सप्टेंबर रोजी 21 वर्षीय महिलेने सोनसाखळी चोरीची फिर्याद दिली होती. याचा तपास करताना आरोपी आर.एन्ड.डी.ई. गेटलगत दुचाकी लावून चोरी करुन गाडीसह आळंदीकडे जाताना दिसून आला. दरम्यान, अशा प्रकारे चंदननगर, विमानतळ व अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याची माहिती मिळाली. येथील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी हेल्मेट व जर्किन घातलेला जाडसर असलेला व्यक्ती आरोपी असल्याचे आढळले. सर्व गुन्ह्यांत एकच आरोपी असल्याचे निष्पन्न होताच तपासाने वेग घेतला. आरोपीची कार्यपद्धती लक्षात घेता, तो ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत होता. दुचाकी चोरुन त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत होता. चोरीवेळी वापरलेली दुचाकी रस्त्यात सोडून दुसरी दुचाकी घेऊन तो पुढे जात होता. वाहनांची अदलाबदली केल्याने पोलिसांना आपला माग लागणार नाही, असा त्याचा समज होता. चौकाचौकांत सीसीटीव्ही असल्याने तो जास्तीतजास्त गल्ली-बोळांचा वापर करत होता.
गुन्हा केल्यावर तो वारंवार खराडी भागात दुचाकी सोडून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे त्याने दुचाकी सोडलेल्या परिसरात पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे पेरले. एका ठिकाणी लावलेली गाडी तो घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अंमलदारांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तो वडगाव शेरी पाण्याच्या टाकीच्या दिशेने जात असताना दिसताच पाठलाग करण्यात आला. त्याला थोड्याच अंतरावर पकडण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, लक्ष्मर बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते, झाजड, पोलीस अंमलदार विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, किशोर दुशिंग, अझरुद्दीन पठाण, प्रफुल्ल मोरे, रिहाण पठाण, उत्तम गट, शेखर गराडे, संदीप देवकाते, अनिकेत भिंगारे, सतीष मुंढे, लोहकर, संजय अढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, प्रवीण भालचिम, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.