पुणे -गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होताना दिसत आहे. यंदा जानेवारीचे उत्पन्न 40 कोटी 60 लाख रुपये मिळाले असून गेल्यावर्षी जानेवारीच्या तुलनेत 3 कोटी 16 लाखांनी वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) उत्पन्न काही महिन्यांपासून सतत घटत होते. परिणामी, मार्गावर बस धावूनदेखील आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे, मागील काही महिन्यांपासून प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. यात चालक-वाहकांना मार्गावर बस संचलन करण्यासाठी टार्गेट दिले जात आहे. चेकरांची संख्या वाढवित विनातिकीट प्रवाशांवर कारवाई सुरू आहे.
तसेच, पास केंद्रांची संख्या वाढवून 22 दिवसांच्या पैशात महिनाभर प्रवास करता येणार आहे. यामुळे, सातत्याने रद्द होणाऱ्या फेऱ्यांचे प्रमाण कमी झाले. गर्दीच्या वेळी जादा गाड्या सोडून ब्रोकन पद्धत राबविली. याचबरोबर, बेशिस्तांवर दंडात्मक व निलंबनाची कारवाई केल्याने उत्पन्न वाढीस हातभार लागल्याचे, वाहतूक विभागाचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.