न्यूझिलंडच्या किनाऱ्यावर येऊन पडले अनेक ‘व्हेल’

वेलिंग्टन – न्यूझिलंडच्या किनाऱ्यावर अनेक व्हेल येऊन पडल्याचे आढळून आल्यामुळे तेथील पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्त्यांनी या व्हेलना पुन्हा समुद्रात नेऊन सोडण्यास सुरुवात केली आहे. न्यूझिलंडच्या साऊथ आयलंडच्या फेअरवेल स्पिट या किनाऱ्यावर 49 व्हेल येऊन पडल्याचे आढळून आले होते. त्यापैकी 40 व्हेल माशांना पुन्हा एकदा समुद्रात नेऊन सोडण्यात कार्यकर्त्यांना यश आले आहे. मात्र 9 व्हेल मरण पावले आहेत.

या व्हेलची कातडी कोरडी पडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर पाण्याच्या बातल्या ओतल्या. त्यांच्या पंखांवर अतिरिक्त वजन पडू नये म्हणून त्यांना उताणे केले गेले आणि त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, अशी व्यवस्थाही केली गेली होती, असे “प्रोजेक्‍ट जोना’ या व्हेल बचाव मोहिमेच्या प्रवक्‍त्या लुईसा हॉक्‍स यांनी सांगितले.

संध्याकाळी समुद्राला भरती आल्यावर भरतीच्या पाण्याबरोबर व्हेल पाण्यामध्ये ओढले गेले. संपूर्ण किनाऱ्यावर व्हेल येऊन पडले होते. एकूण 200 कार्यकर्ते या व्हेलना वाचवण्यासाठी प्रयत्नशील होते, असेही त्यांनी सांगितले.

समुद्रात सोडलेल्या या व्हेल खोल समुद्रात गेलेल्या नाहीत. त्यामुळे भरतीच्या मोठ्या लाटांबरोबर या व्हेल पुन्हा किनाऱ्यावर येण्याची शक्‍यता अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे व्हेल खोल समुद्रातच असतात. फारच क्‍वचित त्या किनाऱ्याजवळ येतात. मात्र इतक्‍या मोठ्या संख्येने व्हेल मासे किनाऱ्यावर येऊन पडण्यामागचे नेमके कारण उलगडू शकलेले नाही.

यापूर्वीही न्यूझिलंडच्या किनारपट्टीजवळ 650 संख्यने व्हेल मासे येऊन पडल्याचे बघितले गेले होते. तेंव्हाही पर्यावरण स्नेही नागरिकांच्या गटाने यापैकी 300 व्हेल लॉंचला बांधून खोल समुद्रात नेऊन सोडले होते. मात्र 350 व्हेलचा मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.