बारामती, इंदापूर, शिरूर, दौंडला मोठ्या पावसाची प्रतीक्षा
पुणे – मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मावळ, मुळशी, वेल्हा, जुन्नर आणि भोर तालुक्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्व धरणे भरली आहेत. तर नेहमीप्रमाणे बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर तालुक्यावर अजूनही पावसाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.2) भोर तालुक्यात सरासरी एकूण पाऊस 627 मिमी झाला.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. जिल्ह्यात आतापर्यंत साधारणत: पेरण्यांची कामे 28 टक्के पूर्ण झाली आहेत. त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली होती. पाणीटंचाई असलेल्या इंदापूर, बारामती, पुरंदर आणि शिरूर भागात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र, तहान भागेल इतका पाऊस न झाल्यामुळे या तालुक्यांतील नागरिक चिंतेत आहेत.
जूनपासून झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)
हवेली – 351, मुळशी – 1,764, भोर – 1,125, मावळ – 2,016, वेल्हे – 1,793, जुन्नर-690, खेड – 727, आंबेगाव – 509, शिरूर – 237, बारामती – 232, इंदापूर – 129, दौंड – 149, पुरंदर – 346.