भरचौकात तरुणाने घेतला गळफास : तिघांनी संपविली तिशीपूर्वीच जीवनयात्रा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी आत्महत्या केल्याने गुरुवारचा दिवस आत्महत्येचा दिवस ठरला आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या चौघांपैकी तीन जण तीस वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण आहेत.
पहिली घटना काकडे पार्क, चिंचवड येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विद्या सूर्यकांत घोडेकर (वय 48, रा. चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. विद्या यांचे पती सूर्यकांत हे सकाळी मॉर्निग वॉकला गेले होते. त्यावेळी विद्या या झोपलेल्या होत्या. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास ते परत आले असता विद्या यांनी साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले आपल्या बेडरूमध्ये झोपलेली होती.
दुसऱ्या घटनेत वाकडमध्ये एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि. 10) दुपारी घडली. सपना गणेश काळे (वय 21, रा. म्हातोबा नगर, वाकड), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गुरूवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सपना यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
तिसऱ्या घटनेत वाकडमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. अमोल अंबादास खराटे (वय 28, रा. राधाकृष्ण कॉलनी, माऊली चौक, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल यांनी गुरूवारी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
जाहिरातीच्या होर्डिंगला गळफास एका तरुणाने भर चौकात जाहिरातीच्या होर्डिंगला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास कोकणे चौक, रहाटणी येथे उघडकीस आली.
नितीन उद्धव मंडलिक (वय 27, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत नितीन हा मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. मागील दहा वर्षांपासून तो रहाटणी येथे राहत होता. एक वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. नितीन उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होता. बुधवारी रात्री त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.