124 संशयित रुग्णांना टॅमीफ्लू देऊन आराम करण्याचा सल्ला
पुणे – शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 4 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि मध्येच जोरदार पाऊस यामुळे प्रादुर्भाव कमी-अधीक प्रमाण होत असून, शुक्रवारी दिवसभरात 124 संशयीत रुग्णांना टॅमीफ्लू देऊन आराम करण्याचा सल्ला दिला.
मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. दिवसाआड 2 ते 3 रूग्ण स्वाईन फ्लूचे आढळून येत होते. त्यामुळे अतिदक्षता विभाग आणि वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक वाढली. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा चटका वाढला. त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भावही कमी झाला होता. सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण आणि रात्री हवेतील गारवा यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली.
शुक्रवारी साडेचार हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 124 संशयीत आढळून आले असून, त्यांना टॅमीफ्लू देण्यात आले. स्वाईन फ्लूचा एक व्यक्ती आढळून आला. दरम्यान, 1 जानेवारी ते 26 सप्टेंबरपर्यंत शहरात 171 रूग्ण स्वाईन फ्लूचे आढळून आले. तर 13 हजार संशयीतांना औषधोपचार देण्यात आले आहे.
संसर्ग टाळा
नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधूनच घराबाहेर पडावे. घसा खवखव करणे, दुखणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी. घर आणि परिसरात पावसाच्या साठलेल्या पाण्याला मोकळी जागा करून द्यावी. दमट वातावरण असल्यावर विशेष काळजी घ्यावी.