करोनाचा धोका पुन्हा वाढला! 4 महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक; एकाच दिवसात तब्बल…

मुंबई – राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढतच चालला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून करोनाने वेग धरला असून तो आता आणखीन वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यातील नव्या करोना रुग्णांनी सुरुवातीला 8 हजार, मग 9 हजार आणि आता तर 10 हजारांचा आकडा ओलांडला आहे. अवघ्या काही दिवसांत राज्यातील करोना रुग्ण भरभर वाढू लागले आहेत.

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दिवसभरात तब्बल 10 हजार 216 रुग्ण सापडले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात सर्वात जास्त रुग्ण मुंबई आणि नागपुरात आढळले आहेत. दोन्ही ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई आणि नागपुरात अनुक्रमे 1,174 आणि 1,225 नवे करोनाबाधित आढळले आहेत.

दरम्यान, सध्या 88,800 पेक्षा जास्त ऍक्‍टिव्ह रुग्ण आहे. ऍक्‍टिव्ह रुग्णांचा विचार करता पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो. पुण्यात 18 हजार, तर नागपुरात 11 हजारपेक्षा जास्त ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबई-ठाण्यात 9 हजार रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.