नगर – अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहेत. आज पंचनामे करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात आले असले तरी जोपर्यंत सर्व क्षेत्राचे पंचनामे होत नाही तोवर पाहणी चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे 97 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
1 हजार 526 गावांतील 2 लाख 90 हजार 896 हेक्टर क्षेत्रावरील 3 लाख 75 हजार 118 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अजून 9 हजार 128 शेतकऱ्यांच्या 2996 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे बाकी आहेत. नगर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. दोन दिवसांत काही भागात उघडीप दिली असली तरी गुरूवारी कर्जत तालुक्यातील मिरजगाव व माहिजळगाव या गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आज देखील जिल्ह्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचनामे करतांना प्रशासनाची कसरत होत आहे.
8 नोव्हेंबरपर्यंत सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु नुकसान झालेल्या क्षेत्राचा विचार करता तीन ते चार दिवसांत हे पंचनामे पूर्ण होणे शक्य नव्हते. तरी प्रशासनाने आतपर्यंत 97 टक्के पिकांचे पंचनामे केले आहे. सतत होणाऱ्या पावसाने खरीप व रब्बीमधील बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू आहे.
प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार, शुक्रवारपर्यंत 1 हजार 526 गावांतील 2 लाख 90 हजार 896 हेक्टर क्षेत्रावरील 3 लाख 75 हजार 118 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित 9 हजार 128 शेतकऱ्यांच्या 2 हजार 996 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे बाकी आहेत. काही भागात पंचनामे करण्यासाठी कर्मचारी गेले नसल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. झालेल्या नुकसानीचे 24 तासांत पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचण्यास उशिर झालेला आहे.
तालुकानिहाय बाधित क्षेत्र
(कंसात शेतकरी व हेक्टर क्षेत्र)
अकोले ः 25634 (12680), शेवगाव ः 44235 (38713), राहाता ः 17879 (22089), संगमनेर ः 27708 (22785), पारनेर ः20610 (12614), जामखेड ः 7143 (3664), नेवासा ः31804 (25875), श्रीरामपूरः 26534 (23239), नगरः 11344 (8200), पाथर्डी ः 45129 (35319), श्रीगोंदा ः 20783 (21274), कर्जत ः 20152 (14604), राहुरी ः 30833 (21904), कोपरगाव ः 36330(27932).