शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना आता आज पुन्हा शिक्रापुरात 4, कोरेगाव भीमात 2 रुग्ण आढळून आले आहेत, तर दरेकरवाडी व धानोरे येथे प्रथमच कोरोनाचा शिरकाव होऊन दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून धानोरे येथील एका बड्या उद्योजकाला देखील कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर आजूबाजूच्या सणसवाडी, कोरेगाव भीमा यांसह आदी गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर, शिक्रापूर येथे आज पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 3 कंपनी कामगार असून यापूर्वी ज्या कंपनीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्याच कंपनीतील हे तिघे कामगार आहेत.
कोरेगाव भीमा येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र आजपर्यंत कोरोना रोखू शकलेल्या दरेकरवाडी व धानोरे या दोन्ही गावांमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरेकरवाडी येथील महिला आजारी असल्याने तळेगाव ढमढेरे येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु असताना तेथे करण्यात आलेल्या तपासणीत तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच धानोरे येथील उद्योजकास काही त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतः तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सदर परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले.
शिक्रापूर येथील चौघांच्या संपर्कातील चौदा जणांना तर कोरेगाव भीमा येथील दोघांच्या संपर्कातील 9 जणांना तसेच धानोरे येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 4 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून धानोरे येथील उद्योजकाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरवातीपासून आत्तापर्यंत गावामध्ये कोरोना रोखण्यात ग्रामस्थांना यश आलेले असताना आता अचानकपणे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेत विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन दरेकरवाडीचे पोलीस पाटील पांडुरंग दरेकर व धानोरेचे पोलीस पाटील स्वप्नील झगडे यांनी केले आहे.