राज्यातील आकडेवारी : सर्वाधिक संख्या मुंबईत
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत 4 हजार 470 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. यात मुंबई विभागातील सर्वाधिक 2 हजार 210 विद्यार्थ्यांची संख्या आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी 9 भाषा विषयांसाठी कृतिपत्रिकांचा वापर करण्यात आला होता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित, संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलण्यात आला होता. परीक्षेस एकूण 151 विषय होते. विविध माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेची संख्या 351 एवढी होती. विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमांतून तर इतर शाखांसाठी या चार माध्यमांसह गुजराती व कन्नड अशा सहा माध्यमांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. व्यवसाय शिक्षण विषयक अभ्यासक्रमाअंतर्गत एकूण 2 हजार 283 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यार्थ्यांसाठी 57 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती.
नऊ विभागीय मंडळाचा विचार करता 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी महत्त्वाचे ठरतात. यात पुणे विभागात 575, नागपूरमध्ये 372, औरंगबाद-287, मुंबई-2 हजार 210, कोल्हापूर-239, अमरावती-384, नाशिक-163, लातूर-178, कोकणात 62 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्याच्या एकूण निकालात बाजी मारणारा कोकण विभाग हा 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी संख्येत सर्वांत मागे राहिला आहे.
प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 75 टक्क्यांच्या पुढे 1 लाख 2 हजार 552 विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत. प्रथम श्रेणीत 60 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 64 हजार 47 एवढी आहे. द्वितीय श्रेणीत 45 टक्क्याच्या पुढे गुण मिळवण्यामध्ये 6 लाख 3 हजार 119 विद्यार्थ्यी समाविष्ट झाले आहेत. उत्तीर्ण श्रेणीत 35 टक्क्याच्या पुढे 51 हजार 441 विद्यार्थी आहेत.
मुले व मुली यांच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींचीच सर्व विभागात आघाडी मिळविली असल्याचे एकूण निकालावरुन स्पष्ट होते. कोकण विभागात मुलांमध्ये सर्वाधिक 90.25 टक्के व मुलींमध्ये 96.45 टक्के निकाल लागला आहे. नागपूर विभागात मुलांमध्ये सर्वात कमी 78.89 टक्के व मुलींमध्ये 86.32 टक्के निकाल लागला आहे.