#WIvInd : भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश; अखेरच्या टी-20 सामन्यात विजयी

प्रोव्हिडन्स – गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर भारताने अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा सात गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने आपल्या नावे केली.

वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 146 धावांची मजल मारत भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन 3 तर रोहितच्या जागी संघात दाखल झालेला लोकेश राहुल 20 धावा करुन परतल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी 106 धावांची भागिदारी करत संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवल्यानंतर विराट 59 धावांची खेळी करुन परतल्यावर ऋषभने नाबाद 65 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत विंडीजच्या डावावर पुन्हा एकदा अंकुश मिळवला. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डने एकाकी झुंज देत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.

सलग तिसऱ्या सामन्यात विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एविन लुईस आणि सुनिल नरिन झटपट माघारी परतले. दिपक चहरने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. यानंतर शिमरॉन हेटमायरही चहरच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी वेस्ट इंडिजचा डाव सावरला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर विंडीजचा डाव 146 धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाले. यावेळी भारताकडून दिपक चहरने 3, नवदीप सैनीने 2 तर राहुल चहरने 1 बळी घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.