शहरासह जिल्ह्यातील आठ हजार सरकारी, खासगी शाळांचा समावेश
पुणे – शहरासह जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या सोमवारपासून (दि.23) सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी, खासगी शाळांमधील 39 हजार शिक्षकांची करोनाची “आरटी पीसीआर’ मोफत चाचणी होणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून संबंधित भागातील कोविड केअर सेंटरवर जाऊनच तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरकारी अनुदानित तसेच खासगी आणि जिल्हा परिषदेच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या आठ हजार शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेतीन हजार शाळांचा समावेश आहे. पहिली ते बारावीपर्यंत आठ हजार शाळांमध्ये 70 हजार 633 एवढ्या शाळा आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण 39 हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण 22 हजार 522 शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांची मोफत चाचणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात 22 हजार 522 शिक्षकांची 26 स्वॅब संकलन केंद्रावर चाचणीचे नमुने संकलित केले जाणार आहेत. दररोज 2 हजार 410 एवढ्या जणांची चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्याचे अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांनी कोणती काळजी घ्यावी, त्याबाबत जनजागृतीसाठी शाळांनी 22 नोव्हेंबरला पालक मेळावे घ्यावा. त्या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना वाहनातून पाठविताना सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करण्याच्या सूचना पालकांना द्याव्यात. वर्ग सुरू होणार असले तरी राज्य सरकारने विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केली नाही. त्यामुळे पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील.
काळजी काय घ्यावी…
– वर्ग सॅनिटाइज करावेत
– शौचालये दिवसातून तीनदा स्वच्छ करावीत
– शाळांत “थर्मल गन’ उपलब्ध असावी
– “मिड डे मिल’मध्ये स्वच्छता पाळावी
– जेवणावेळीही सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे
– विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दोन टप्प्यात शाळा
– रिक्षा, मिनीबसमध्येही सुरक्षित अंतर ठेवावे
– स्कूल बसचालकांनी नियमाचे पालन न केल्यास परवाना रद्द
– संशयित विद्यार्थाची तत्काळ तपासणी करून घ्यावी