पाटण – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी कायदा लागू असताना संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटणमध्ये 39 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 17 महिलांचा व 22 पुरुषांचा समावेश होता. यापुढे संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिला.
देशात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कायदा लागू केला असताना नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी सकाळी पाटण शहरात असेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटण पोलिसांनी 39 जणांवर कारवाई केली. यामध्ये 17 महिलांचा समावेश असून 22 पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
पाटण शहरात केवळ जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर पडण्याची मुभा नागरिकांना आहे. मात्र, त्यासाठी कोणतेही वाहन न वापरणे बंधनकारक आहे. असे असतानाही संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. यापूर्वी दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई पाटण पोलिसांनी केली आहे. तर मंगळवारी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली आहे.