खरगोन (म.प्र.) – भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ( PM Narendra Modi Bhopal rally) सभेच्या ठिकाणी लोकांना घेऊन जाणाऱ्या बसेस पैकी एका खासगी बसने खरगोन जिल्ह्यात एका थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 39 जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
रविवारी रात्री कासरवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पंतप्रधानांची भोपाळ मध्ये आज सभा होणार आहे, त्यासाठी लोकांना या बसने तिकडे नेले जात होते.
गोपाळपुरा गावाजवळ ही खासगी बस तेथे थांबलेल्या ट्रकला धडकली. सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यापैकी अनेकांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. पण काहींवर अजून तेथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या एकाला पुढील उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आले आहे.