पुणे – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा करोनाचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह बंधनकारक आहे. विमानतळावर दाखल होणाऱ्या संशयित प्रवाशांचीदेखील करोना चाचणी करण्यात येते. लोहगाव विमानतळावर केलेल्या या तपासणीत डिसेंबरमध्येसुमारे 39 प्रवाशांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांतून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. तसे असेल, तरच बोर्डिंग पास देण्यात येतो. तर लोहगाव विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची पालिकेकडून चाचणी करण्यात येते.
निर्बंध असणाऱ्या 4 राज्यांतून दररोज सुमारे 13 ते 17 विमानांची ये-जा होत असून, याद्वारे सुमारे दीड हजारांहून अधिक प्रवासी दाखल होतात. दि.1 ते 31 डिसेंबर या कालावधीत लोहगाव विमानतळावर सुमारे 2 हजार 472 प्रवाशांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.