काँग्रेस नेत्याच्या बंगल्यात महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं, ‘तुमच्या आय़ुष्यात हवं होत स्थान’

भोपाळ – काँग्रेस नेते आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या भोपाळमधील शाहपूरा परिसरात असलेल्या बंगल्यात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  मृत महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमुळे महत्त्वपूर्ण खुलासा होण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुसाईड नोट जप्त केली आहे.

सोनिया भारद्वाज (39) असं महिलेचं नाव असून ती हरियाणाच्या अंबाला येथील बालदेव नगर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीचं नाव संजीव कुमार असून ती मंत्री उमंग सिंघार यांच्या शाहपूर येथील बंगल्यात राहत होती. रविवारी या महिलेने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मध्य प्रदेशमधील राजकारण तापलं आहे.

पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने लिहिलं की, ‘मला तुमच्या आयुष्यात स्थान हवं होतं. आता मला सहन होत नाही. खूप राग येतोय पण उत्तर मिळत नाही. पुढे महिलेने तिच्या मुलाबाबत लिहलंय की, तू मला आवडतोस, परंतु मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. आय लव्ह यू. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे’.

मृत महिला मागील २५ दिवसांपासून मंत्र्यांच्या बंगल्यात राहत होती. मंत्री उमंग सिंघारही आत्महत्येच्या २ दिवसापर्यंत बंगल्यातच राहत होते. महिलेला एख १८ वर्षांचा मुलगा आहे. या घटनेनंतर उमंग सिंघार म्हणाले की,  तिच्या आत्महत्येमुळं मी हैराण आहे. ती माझी चांगली मैत्रिण होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.