नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराची भारतीय भांडवल बाजारातील गुंतवणूक तब्बल 38.51 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हा एक विक्र्रम आहे. गेल्या महिन्यात या गुंतवणूकदारांनी 63 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यातील 63,350 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतविण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया आणि तैवान या आशियाई शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारांनी उत्तम कामगिरी केली आहे.
पार्टिसिपेट नोट्स म्हणजे पी-नोट्सच्या माध्यमातून भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक 27 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. पी- नोट्सच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक 83 हजार 114 कोटी रुपयांवर गेली आहे.
जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाल्यामुळे आणि भारतातील कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीत चांगले ताळेबंद जाहीर केल्यामुळे ही गुंतवणूक वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
परकीय गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात नोंदणी न करता परकीय संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून पी- नोट्सद्वारे गुंतवणूक करता येते. सप्टेंबरपर्यंत पि – नोट्स मधून होणारी गुंतवणूक कमी झाली होती. मात्र सप्टेंबरनंतर या माध्यमातून गुंतवणूक वाढली असल्याचे सेबीच्या आकडेवारीतून दिसून येते.
ग्रीन पोर्टफोलिओ कंपनीचे विश्लेषक दिवम शर्मा यांनी सांगितले की, जागतिक बाजारात भांडवल मुबलक उपलब्ध आहे. सरकारी रोख्यांवरील परतावा कमी झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक वाढत आहे. भारतातील मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर वाढला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहेत.