३७० रद्दच्या परिणामांविषयी चर्चा नाही- पवार

मुंबई: केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीर राज्याला असलेला विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून रेटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केला. विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयावर काश्‍मीरच्या लोकांचे म्हणणे काय आहे? यावर चर्चा झाली नाही आणि ही गोष्ट पटण्यासारखी नाही, असेही पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचा भव्य मेळावा प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीत भाजप कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा करण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन पवार यांनी आज काश्‍मीर संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशामध्ये प्रत्येक ठिकाणी राजांचे अधिकार होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकसंघ केले. काश्‍मीरची परिस्थिती त्यावेळी वेगळी होती. तिथे राजा हिंदू होता तर 90 टक्के जनता मुस्लिम होती. त्यामुळे तिथल्या लोकांच्या काही अटी होत्या. परंतु काश्‍मीर भारतामध्ये आला. काश्‍मीरला विशेष अधिकार देण्यात आले. आजच्या सरकारने हे विशेष अधिकार बाजुला केले आहेत. याला विरोध नाही, परंतु लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र सरकारने काही मीडियाच्या माध्यमातून या निर्णयाचा प्रचार व प्रसार केला आहे, असेही पवार म्हणाले.

पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेला भारताशी युध्द व्हावे असे कधीच वाटत नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष असताना आपण भारताचा क्रिकेटचा संघ घेऊन जेव्हा पाकिस्तानात गेलो त्यावेळी आम्हाला सर्वात जास्त प्रेम मिळाले. मात्र, आज देशात पाकिस्तान म्हणजे मुस्लिम असे वेगळे वातावरण तयार केले जात आहे, अशी खंत व्यक्त करतानाच त्याविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

नैसर्गिक संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक तासासाठी सांगलीला आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा पाऊल ठेवले नाही. पूरग्रस्त सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात ना राज्याचे प्रमुख गेले ना देशाचे प्रमुख गेले. मात्र, देशात सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील यावर काम केले जात आहे, असा आरोपही पवारांनी लगावला. आज देशात प्रत्येक ठिकाणी नाराजी ऐकू येते. समाजातील काही विशिष्ट घटकांवर हल्ले होत आहेत. मॉंब लिचिंग हा शब्द कधी ऐकला नव्हता. परंतु, आता आज सारखा ऐकायला मिळत आहे. याविरोधात एकत्र येण्याची गरज आहे , असे पवार म्हणाले.

वंचितवर टीका
पवार यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीचाही समाचार घेतला. गरीब लोकांचा पक्ष अशी वंचितची ओळख आहे. ही आघाडी धर्मनिरपेक्षतेचा दावा करते. परंतु, निवडणुकीत ते भाजपला फायदा करून देत आहेत, असा टोला पवार यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)