370 आणि कलम 35-ए चे रक्षण करणे यालाच प्राधान्य- मेहबुबा

श्रीनगर- जम्मू काश्‍मीरची ओळख आणि कायदेशीर असलेल्या राज्यघटनेच्या कलम 370 आणि 35 ए चे रक्षण करणे यालाच आपल्या पक्षाचे प्राधान्य आहे. या कलमांच्या रक्षणासाठी आपण मोठा लढा द्यायला तयार असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. “पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या 20 व्या स्थापनादिनानिमित्त कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.

काश्‍मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी आपले वडील मुफ्ती मोहंम्मद सईद यांनी केंद्र सरकारवर सर्वाधिक दबाव आणला होता, असेही मेहबुबा म्हणाल्या. आपला पक्ष भ्रष्टाचारी नाही. त्यामुळे “ईडी’ आणि “सीबीआय’च्या छाप्यांना घाबरणार नाही. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर छापे घालणे हे काश्‍मीर प्रश्‍नावरील उत्तर असणार नाही. कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्र्यासाठी सत्ता कायमस्वरुपी नाही, असेही त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी बोलताना मेहबुबा यांनी काश्‍मीर प्रश्‍न हा राजकीय प्रश्‍न असून लष्कराच्या वापराद्वारे सोडवला जाऊ शकणार नसल्याचे म्हटले होते. जोपर्यंत पाकिस्तान आणि जम्मू काश्‍मीरमधील नागरिकांशी चर्चा केली जात नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न सोडवला जाणार नाही. लष्कराच्या बळावर तात्पुरती शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. पण दीर्घकालीन शांततेसाठी हा प्रश्‍न चर्चेद्वारेच सोडवला जायला हवा, असेही मेहबुबा म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.