डेटिंग साईटवर गेला आणि गळाला लागला
पुणे – एका डेटिंग साइटवर ओळख झालेल्या मैत्रिणीने एका संगणक कंपनीतील उच्च पदस्थाला तब्बल 37 लाख 54 हजाराचा गंडा घातला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आठ मोबाइल धारक आणि तब्बल 23 बॅंक अकाऊंट धाकरकांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अभिजीत सुर्यकांत शिवरकर (वय 32, रा.लोहगाव, धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांची एका डेटिंग साइटवर मार्च 2019 मध्ये स्टेफनी जॉनसन नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. चॅटींगच्या माध्यमातून ते तीच्या सातत्याने संपर्कात रहात होते. दरम्यान, तीने भारतामध्ये मोठी रोकड घेऊन येत असल्याचे फिर्यादीला भासवले.
फिर्यादीला कस्टम ऑफिसर असल्याचे सांगत एकाने कॉल केला होता. त्याने तुमची मैत्रिण स्टेफनी हिच्या जवळ दहा हजार पौडची रक्कम असून तीची सुटका करायची असेल तर कस्टम चार्जेस भरावे लागतील, असे सांगितले. यानंतर फिर्यादीकडून कस्टम चार्जेस, मनी लॉंड्रींग सर्टिफिकेट, बॅंक प्रोसेसिंग चार्जेस, इन्कम टॅक्स, जीएसटी चार्जेस, डेबिट कार्ड आदी नावाकाली विविध 23 बॅंक खात्यामध्ये 37 लाख 54 हजार भरावयास भाग पाडले. ही रक्कम चार ते पाच महिन्याच्या कालावधीत फिर्यादीने भरली. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे करत आहेत.