नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 34 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या 5165 ने वाढली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 74 लाख 46 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 लाख रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 60 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 44 लाख एवढी आहे.
कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये 20 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. एक लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या ब्राझील कोरोनाचे नवे केंद्र असल्याचे दिसून येत आहे.
ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त रुग्णांची आणि मृत्यूंची नोंद केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 33,100 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 20,852 नवे रुग्ण आढळून आले असून 982 रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.