“एमपीएससी’ परीक्षेत रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला. या निकालात पुण्याचा रोहितकुमार राजपूत हा राज्यात प्रथम आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे हे मागास प्रवर्गातून राज्यात प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हे ह्या राज्यातून प्रथम आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयोगातर्फे दि. 16 ते 18 सप्टेंबर रोजी 2017 रोजी एकूण 377 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा अंतिम निकाल जाहीर झाला. तसेच, पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुणही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 2 एप्रिल रोजी 2017 रोजी झाली. या पूर्व परीक्षेसाठी 1 लाख 98 हजार 599 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी 4 हजार 839 उमेदवार पात्र ठरले. मुख्य परीक्षा सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 194 उमेदवार पात्र ठरले. त्यातून 377 जणांची निवड करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्‍त, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, कक्षाधिकारी, भूमी अभिलेख उपअधीक्षक, सहायक प्रकल्प अधिकारीसह अन्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. अंतिम निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविण्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे, असे आयोगाचे उपसचिव विजया पडते यांनी सांगितले.

पुण्यातील “सीओईपी’मधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेल्या रोहित राजपूत हा मूळचा जळगावचा आहे. त्याचे आई-वडिल दोघेही फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. रोहित सध्या पुण्यातील विमाननगर येथे राहत आहे. समाजाच्या सेवेसाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्यात यश मिळाल्याची प्रतिक्रिया रोहित राजपूत याने दै. “प्रभात’शी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)