नवी दिल्ली: केंद्रात मंत्री म्हणून 36 मंत्र्यांना दुसरा कार्यकाळ मिळाला. तर 20 खासदार पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत. मंत्री बनलेले 45 जण लोकसभेचे तर 10 जण राज्यसभेचे सदस्य आहेत. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे रामविलास पासवान आणि एस.जयशंकर हे संसदेच्या कुठल्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्या दोघांचीही लवकरच राज्यसभेवर निवड केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात 6 महिलांना स्थान
केंद्रीय मंत्रिमंडळात सहा महिलांना स्थान मिळाले आहे. महिला मंत्र्यांमध्ये निर्मला सीतारामन्, स्मृती इराणी, हरसिम्रत कौर बादल, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह सारुता आणि देबश्री चौधुरी यांचा समावेश आहे. यावेळी लोकसभेवर निवडून गेलेल्या महिला खासदारांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठला आहे. मात्र, मागील वेळेपेक्षा यावेळी महिला मंत्र्यांच्या संख्येत घट झाली आहे. मागील वेळी आठ महिला मंत्री होत्या.