बेल्हे -आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना या विषाणूचे संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. या विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता उपाययोजना म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार रविवारी (दि. 29) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर आळेखिंड येथे नाकाबंदी करीत असताना सुमारे 36 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स घेऊन जाणारे दोन आयशर टेम्पो आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत माहिती अशी की, आळेफाटा पोलीस पुणे- नाशिक महामार्गावर नाकाबंदी करत असताना रात्रीच्या वेळी आयशर टेम्पो (यूपी 15 डीटी 5876 व यूपी 37 टी 6441) या दोन्ही वाहनांत विदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स भरलेले मिळून आले. दोन्ही वाहनातील चालक अनुक्रमे तस्लिम मुन्नवर मोहम्मद (वय 29, रा. असिलपूर, ता. जि. मेरठ, उत्तर प्रदेश) व अजिम मुस्किम त्यागी (वय 29, रा. कमालपूर, जि. हापूड, उत्तरप्रदेश) यांना दोन्ही वाहने व मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या एका आयशर टेम्पोत रोकफोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रिअर व्हिस्कीचे 500 बॉक्स अंदाजे किंमत 18 लाख 3 हजार 710 रुपये तर दुसरा आयशर टेम्पोत रोकफोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रिअर व्हिस्कीचे 500 बॉक्स अंदाजे किंमत 18 लाख 3 हजार 710 रुपये असा एकूण दोन्ही मिळून 36 लाख 7 हजार 420 रुपये विदेशी दारूचा मुद्देमाल व दोन टेम्पो प्रत्येकी 20 लाख प्रमाणे असा एकूण 76 लाख 7 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर तसेच उपनिरीक्षक एस. ए. डौले, एस. व्ही. घाडगे, हवालदार एन. टी. गायकवाड, पोलीस नाईक एम. एस पटारे, एन. आर. कारखेले, शिपाई के. पी. कुलकर्णी, पी. डी. गर्जे, एच. एस. करे, ए. एस. वैद्य यांनी केली आहे.