नगर (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी मंगळवार (दि.६) रोजी नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. यात जिल्ह्यात ३६ लाख ७३ हजार ९६९ मतदार असून यात १९ लाख ४ हजार ४९ पुरूष तर १७ लाख ६९ हजार ७२० महिला मतदार तर २०० इतर मतदारांचा समावेश आहे.
प्रसिध्द झालेल्या मतदार यादीवर विधानसभा मतदारसंघनिहाय दावे- हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर या मतदारसंघात मतदान केंद्रनिहाय नव मतदार नोंदणीसाठी विशेष माहिम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर दि.३० ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
दरम्यान, जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत सर्वाधिक मतदार हे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात ३ लाख ६३ हजार ८८ असून त्या खालोखाल पारनेर मतदारसंघात ३ लाख ४२ हजार ५६२ आहेत.
तर सर्वात कमी मतदार हे अकोले मतदारसंघात २ लाख ५९ हजार ७६५ असून नेवासा तालुक्यात २ लाख ७५ हजार ४३६ मतदार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
ही यादी प्रसिध्द केल्यानंतर मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, १० ऑगस्टपर्यंत नव मतदारांना अर्जनंबर ६ भरून १८ वर्षे पूर्ण होणार्यांना मतनोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.
तसेच त्यानंतर २० तारखेपर्यंत मतदार यादीवरील दावे आणि हरकती स्विकारता येणार असून मतदार नोंदणीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालिमठ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात मतदार यादी पुन:परिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी राजकीय पक्षांच्या सहभाग महत्वाचा असून राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधी मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) म्हणून नेमणूक करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सालिमठ यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यात मतदानाच्या वेळी गर्दी होवू नयेत, मतदानात आणखी सुसूत्रता यावी, यासाठी ३४ ठिकाणी नव्याने मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात पूर्वी ३ हजार ७३१ मतदान केंद्र होती त्यात आता वाढ होवून ३ हजार ७६३ मतदान केंद्र होणार आहेत.
असे आहेत मतदार
अकोले 2 लाख 59 हजार 765 मतदार. संगमनेर 2 लाख 81 हजार 47 मतदार. राहाता 2 लाख 80 हजार 352 मतदार. कोपरगाव 2 लाख 81 हजार 347 मतदार. श्रीरामपूर 3 लाख 3 हजार 104. नेवासा 2 लाख 75 हजार 436 मतदार.
शेवगाव एकूण 3 लाख 63 हजार 88 मतदार. राहुरी 3 लाख 13 हजार 230 मतदार. पारनेर 3 लाख 42 हजार 562 मतदार. नगर शहर 3 लाख 5 हजार 376 मतदार. श्रीगोंदा 3 लाख 30 हजार 674 मतदार. कर्जत-जामाखेड 3 लाख 37 हजार 789 मतदार आहेत.