125 इमारतींना महापालिकेकडून नोटीस : 88 इमारतीबाबत नागरिकांनी केली आवश्यक कार्यवाही
पिंपरी – पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता महापालिकेने प्रभागस्तरावर 125 धोकादायक इमारतींना चिन्हित करत दुरुस्ती करावी किंवा इमारती पाडून टाकाव्यात, अशा नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी 36 इमारतींच्या मालकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने शहरातील 36 इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील 125 धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. नागरिकांनी धोकादायक इमारती स्वत: पाडून टाकाव्या किंवा त्यांची दुरूस्ती करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार 88 इमारतींबाबत नागरिकांनी स्वत: कार्यवाही केली आहे. 36 इमारतींबाबत मात्र अद्याप कार्यवाही प्रलंबित आहे.
पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा इमारतींचे महापालिका प्रशासनाकडून प्रभागनिहाय सर्वेक्षण केले जाते. तसेच, त्यातील ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य आहे त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितली जाते. तथापि, दुरुस्ती न करता येणाऱ्या इमारती स्वत: नागरिकांनी पाडून टाकाव्या, असे त्यांना नोटीसद्वारे बजावले जाते. त्यानुसार आत्तापर्यंत 125 बांधकामांना प्रशासनाने नोटीसा दिलेल्या आहेत. त्यातील 88 इमारतींबाबत नागरिकांनी स्वत: आवश्यक कार्यवाही केली आहे. 36 इमारतींबाबत मात्र अद्याप कार्यवाही प्रलंबित आहे.
“ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 56 धोकादायक इमारती
ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक 56 इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या. तर, त्या खालोखाल ड’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत 39 इमारतींना नोटीसा दिलेल्या आहेत. त्याशिवाय क्षेत्रीय कार्यालयनिहाय अ – 8, ब – 5, इ – 6, फ – 3, ग – 8 आदी इमारतींना देखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. क’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत एकाही धोकादायक इमारतीसाठी नोटीस बजावलेली नाही.
अतिधोकादायक 5 इमारती
शहरामध्ये अतिधोकादायक इमारतींची एकूण संख्या 5 इतकी आहे. त्यामध्ये अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सर्वाधिक 2 अतिधोकादायक इमारती आहेत. क’, ग’ आणि ह’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रत्येकी एक अतिधोकादायक इमारत आहे.