तळेगाव दाभाडे – अर्थसंकल्पीय अधिवेशनात मावळ तालुक्यातील विकास कामांसाठी 341 कोटी 35 लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यांची कामे, राज्य उत्पादन शुल्क विभाग इमारतीसाठी निधी यांचा समावेश असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
शिंदे फडणवीस सरकारच्या काळात विकासकामे थांबविण्याचा सपाटा लावला होता. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांनाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थगिती दिली होती. यामुळे आमदार शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीलाही आमदार शेळके यांनी विकास कामांच्या निधीवरून सरकारचे कान टोचले. “हवे तर पडलेल्यांच्या हाताने नारळ फोडून उद्घाटन करा पण माझ्या मावळ तालुक्याला निधी द्या, अशी खोचक टीका त्यांनी सरकारवर केली. दरम्यान, या अर्थसंकल्पात किमान 400 कोटी रुपये निधी मावळसाठी आणण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील खडकाळे, कडधे, काले कॉलनी, परंदवडी, बेबडओहोळ, पिंपळखुटे-शिवणे या रस्त्यांच्या कामाचा समावेश हायब्रीड म्युनिटी या शीर्षकाअंतर्गत करण्यात आहे. रस्त्यांसाठी प्रति कि.मी. 10 कोटी रुपयेनुसार एकूण 32.600 किमीचे रस्ते यातून होणार आहेत. सदर रस्त्यांसाठी अंदाजे रक्कम 326 कोटी रुपये
लागणार आहेत.
दरम्यान, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा लोणावळा येथील स्काय वॉक प्रकल्प, कुंडमळा पूल, कोथुर्णे पूल, वराळे-नाणोली पूल, क्रीडासंकुल या कामांकरिताही निधी मिळणे आवश्यक होते. परंतु, या कामांना या शासनाने कोणत्याही प्रकारचा निधी दिला नसल्याची खंत आमदार शेळके यांनी व्यक्त केली.
“महाविकास आघाडी सरकारने मावळसाठी एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला होता. युती सरकारच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे.
– सुनील शेळके, आमदार
संभाव्य विकासकामे
बेवडओहोळ ते पिंपळखुटे व मळवंडी ढोरे ते थुगाव
– 4 कोटी
कान्हे फाटा-टाकवे बंदिस्त गटार व कॉंक्रीटीकरण
– एक कोटी
आढले रस्त्याची सुधारणा करणेसाठी –
एक कोटी 50 लाख
लोहारवस्ती रस्त्यासाठी ग्रामसडक योजनेतून –
एक 1 कोटी 39 लाख
सुदुंबरे ते ठाकरवाडी रस्त्यासाठी –
83 लाख 25 हजार
खांडशी रस्त्यासाठी –
2 कोटी 98 लक्ष
राज्य उत्पादन शुल्क इमारतीसाठी –
3 कोटी 47 लक्ष