पुणे जिल्ह्यातील 35 गावांच्या घशाला कोरड

सव्वा लाख नागरिकांची भिस्त 61 टॅंकरवर 


बारामती, शिरूर तालुक्‍याला “दुष्काळझळा’

पुणे – जिल्ह्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे टंचाई असलेल्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यात 61 टॅंकरद्वारे 35 गावांमधील 1 लाख 18 हजार 320 नागरिकांची तहान भागविली जात आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात टॅंकरची संख्या झपाट्याने वाढल्याने भविष्यातील दुष्काळाची दाहकता समोर येत आहे.

यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आणि धरणांसह छोटे तलाव, बंधारे अर्धेच भरले. काही ठिकाणी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. जिल्ह्यातील 4 तालुके (भोर, मावळ, मुळशी आणि वेल्हा) वगळता अन्य 9 तालुक्‍यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक टॅंकर बारामती आणि शिरूर तालुक्‍यात सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली.

तालुकानिहाय सुरू असलेली टॅंकर संख्या
1. बारामती – 19 टॅंकर-14 गावांतील 35,736 नागरिकांना पाणीपुरवठा.
2. शिरूर – 17 टॅंकरद्वारे 6 गावांतील 37,449 नागरिकांची तहान भागविली जात आहे.
3. आंबेगाव आणि दौंड येथे प्रत्येकी 7 टॅंकर सुरू.
4. जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्‍यात प्रत्येकी 3 टॅंकर सुरू.
5. हवेली, इंदापूर येथे प्रत्येकी 1 टॅंकरद्वारे गावांना पाणीपुरवठा
6. खासगी टॅंकरची संख्या 51 तर शासकीय टॅंकर 10 आहेत.

…त्यात चाराटंचाईचीही भर
जिल्ह्यात टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सुमारे 379 वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच पशुधनांचा चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. चारा उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. ज्या तालुक्‍यात अधिक चारा उत्पादन झाला आहे, तो साठवण्यात येत असून चारा टंचाई असलेल्या भागात पुरविण्यात येत आहे. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनांनुसार काटेकोर नियोजन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)