उत्तर माणमधील 35 गावांना जिहे-कठापूरचे पाणी मिळणार

आ. जयकुमार गोरे : कुकुडवाड, मायणीसह 32 गावांना मिळणार टेंभूचे पाणी

खटाव – खटाव आणि माण तालुक्‍यातील काही गावे उरमोडी योजनेच्या लाभक्षेत्रात आली आहेत. आता जिहे-कठापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आणून पुढे उत्तर माणमधील 35 गावांना देण्यासाठी योजना मंजूर होत आहे. मायणी आणि कुकुडवाड परिसरातील 32 गावांनाही टेंभू योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली. येत्या दोन वर्षात ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांना माहिती देताना आ. गोरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने खटाव आणि माण तालुक्‍यांना वरदान ठरणाऱ्या उरमोडी उपसा सिंचन योजनेची कामे मार्गी लावत माझ्या मतदारसंघात पाणी आणण्यात मला यश आले. अनेक गावांना त्या पाण्याचा लाभ होत आहे. जिहे-कठापूर योजनेच्या कामांसाठीही आघाडीच्या काळात मोठा निधी मिळाला होता. त्या योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. नेर धरणात पाणी टाकून पुढे माण तालुक्‍यातील आंधळी धरणात नेण्यात येणार आहे. येणाऱ्या 14 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणात आणून माणगंगा नदी प्रवाही करण्याचे नियोजन आहे.

फलटणकर रामराजेंनी मार्डीसह इतर गावांना मिळणारे धोम बलकवडीचे पाणी पळवल्याने माणचा उत्तर भाग कायम दुष्काळी राहिला. या भागाला आंधळी धरणातून जिहेकठापूरचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मार्डीसह मोही, इंजबाव, मलवडी, खुटगाव, रांजणी, पर्यंती, हवालदारवाडी, कारखेल, संभूखेड, वरकुटे म्हसवड, लोणार, खडकी, धुळदेव, राणंद, जाशी, शेवरी, शिखर शिंगणापूर, वावरहीरे, दानवलेवाडी, लक्ष्मीनगर, तोंडले, जाधववाडी, रजवडी, मोगराळे, बिजवडी, वडगाव, पांगरी, टाकेवाडी, भाटकी, सोकासन आणि परिसरातील वाड्या वस्त्या अशा पस्तीस गावांना आंधळी तलावातून उचलून पाणी देण्याची योजना येणाऱ्या अधिवेशनाअगोदर मंजूर होणार आहे. त्यासाठी या सर्व गावांचा समावेश जिहेकठापूर लाभक्षेत्रात करण्याचा प्रस्ताव देण्याचा तसेच ताबडतोप सर्व्हे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे आ. गोरे यांनी केलेला पत्रव्यवहार दाखवून सांगितले.

आ. गोरे पुढे म्हणाले, माण तालुक्‍यातील कुकुडवाडसह 15 आणि खटाव तालुक्‍यातील मायणीसह 15 अशा एकूण 32 गावांना टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. टेंभूचे पाणी कालव्याऐवजी बंदीस्त नलिकेतून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तीन टीएमसी पाणी वाचणार आहे. हे पाणी खटाव आणि माण तालुक्‍यातील 32 गावांना दिले तर शेतीपाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.