दोघांना करोना संसर्ग : उर्वरित व्यक्ती पुण्याबाहेरील
पुणे – ब्रिटनहून परतलेले आणि नंतर गायब झालेल्यांपैकी पुण्यातील 35 प्रवाशांचा शोध लागला आहे. त्यांची चाचणी केली असता, दोघांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रवासी पुण्याबाहेरचे आहेत.
ब्रिटीश सरकारने दिलेल्या यादीनुसार, जवळपास 542 प्रवासी ब्रिटनमधून मुंबईमार्गे पुण्यात आले आहेत. त्यापैकी 109 प्रवाशांचा पत्ता सापडत नव्हता, तसेच त्यांचे फोनही बंद होते. हे प्रवासी गायब झाल्यामुळे आणि त्यांच्या आरोग्याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली होती. या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेतली.
पोलिसांनी या नागरिकांचा शोध घेतला. या 109पैकी 35 प्रवाशांचे पत्ते शहरातील होते. यातील करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचे नमुने “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ चाचणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
उर्वरित प्रवाशांशी संपर्क साधून त्यांची करोना चाचणी केली आहे. त्यामध्ये दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या प्रवाशांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. उर्वरित प्रवाशांची माहिती राज्य रोग सर्वेक्षण कार्यालयाकडे पाठवली आहे.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा