Pakistan : पाकिस्तानात ३४ दहशतवाद्यांना अटक; ११ हाय प्रोफाइल दहशतवाद्यांचा समावेश

लाहोर – पाकिस्तानातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या महिन्यात पंजाब प्रांतात ३४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये ११ हाय प्रोफाइल दहशतवाद्यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि इसिस या संघटनांचे दहशतवादी असल्याचे पंजाब प्रांतातील काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटने निवेदनात म्हटले आहे. लाहोर, बहावलनगर, गुजरांवाला, फैसलाबाद, रावळपिंडी, झेलम आणि रहीम यार खानसह विविध जिल्ह्यांतून या दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे.
लाहोरमध्ये टीटीपीसह अन्य कट्टरवादी गटांशी संबंधित ११ हाय प्रोफाइल दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून स्फोटके, महत्वाच्या सरकारी इमारतींचे नकाशे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे सीटीडीने म्हटले आहे.
त्यांच्याकडून स्फोटके, २८ डिटोनेटर, सुमारे ९० फूट सेफ्टी फ्यूज वायर, बंदुका आणि दारूगोळा, हातबॉम्ब आणि प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले असल्याचेही म्हटले आहे.





