अहमदाबाद : त्याचे नाव आशिक पटेल आहे आणि तो 007 या क्रमांकाचा इतका चाहता आहे की, त्याने त्याच्या कारसाठी हाच क्रमांक मिळावा म्हणून अहमदाबाद आरटीओ कार्यालयाकडे तब्बल 34 लाख रुपये मोजले आहेत. त्याने 39.50 लाख रुपये किंमतीची एसयूव्ही कार खरेदी केली आहे. कार चाळीस लाखांची आणि नंबर प्लेटची किंमत 34 लाख रुपये असा हा मामला झाला आहे. दरम्यान, याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.
आशिक पटेलचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. काहीच दिवसांपूर्वी करोना आणि लॉकडाऊनमुळे कमीतकमी खर्च आणि गरजांमध्ये जगण्याचा मंत्र सांगितला जात होता. त्यामुळे कारच्या किंमतीएवढीच रक्कम नंबरसाठी मोजण्यात कसला आला आहे आनंद, असाही प्रश्न विचारला जात आहे. मात्र त्यामागे स्वतःची काही कारणे आहेत, असे आशिक पटेल सांगतो.
तो म्हणतो, माझ्या नावावर खरेदी केलेले हे पहिलेच वाहन आहे आणि त्यासाठी मला 007 हा क्रमांक मिळाला आणि माझे भाग्य उजाडले. माझ्यासाठी पैसा हा प्रश्न नाही. हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. हा क्रमांक माझ्यासाठी भाग्यकारक आहे.
आशिक पटेल हा न्यू शाहिनबाग परिसरात राहतो. त्याने खरेदी केलेल्या टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीसाठी जीजे-01-डब्लूए 007 असा क्रमांक मिळालेला आहे. या क्रमांकासाठी लिलाव पुकारण्यात आला होता. त्यासाठीची कमीतकमी बोली 25,000 रुपयांपासून होती. लिलावाच्या वेळी आशिक आणि अन्य बोली लावणारे इरेला पेटले. 23 नोव्हेंबरला हा लिलाव झाला.
रात्री उशीरापर्यंत लिलावाची बोली लावण्याचे काम सुरु होते. रात्री अकरा वाजता ही बोली 25 लाखांपर्यंत पोचली. शेवटी 11.53 वाजता आशिक पटेलने 34 लाखांची बोली लावली आणि मध्यरात्रीच्या आत लिलावाचे काम पूर्ण झाले. यावेळी 24 फॅन्सी नंबरसाठी लिलाव झाला. त्यामध्ये 622 लोकांनी भाग घेतला. 007 क्रमांकापाठोपाठ 001 या क्रमांकासाठी 5.56 लाखांची बोली यशस्वी ठरली. 0369 या क्रमांकासाठी 1.40 लाख रुपये मोजण्यात आले.