- 2221 नवीन रुग्णांची नोंद
- 2439 रुग्ण बरे
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना करोना मृत्यूंमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी 34 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर 2221 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 69 हजार 964 वर पोहचली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 2188 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 33 रुग्णांची नोंद झाली. तसेच 34 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 21 व शहराबाहेरील 13 जणांचा समावेश आहे. शहरातील पिंपळे गुरव, रुपीनगर, चिखली, पिंपरी, कुंदननगर, चऱ्होली, चिंचवड, थेरगाव, दिघी, आकुर्डी येथील 21 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहाराबाहेरील बिबवेवाडी, मुळशी, धानोरी, खेड, औंध, बावधन, येरवडा, कोथरुड, खेड, कात्रज व कोंढवा येथील 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिवसभरामध्ये 2439 रुग्ण बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 464 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 10,538 संशयित रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2514 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 5557 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 19,745 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 25,302 इतकी आहे.