पवना धरणात 33 टक्के पाणीसाठा

जुलै अखेरपर्यंत पुरेल शहरासाठी पाणी

पिंपरी (प्रतिनिधी): पवना धरणाची पाणी पातळी सध्या 33.10 टक्क्यांपर्यंत आहे. नुकताच पाऊस झाला असला तरी धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नसून पिंपरी-चिंचवड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे. शहरामध्ये सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा सध्या कायम राहणार आहे.

पवना धरण क्षेत्रातून सध्या शहरासाठी दररोज सरासरी 480 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येते. शहराची पाण्याची वाढती मागणी आणि समान पाणी वाटप व्हावे, या उद्देशाने सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी समस्येविषयीच्या तक्रारींमध्ये घट झाल्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. तथापि, अद्यापही वाकड, पिंपळे सौदागरसह चिखली, मोशी, चऱ्होली, रावेत आदी परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी समस्या कायम आहे.

पवना धरण क्षेत्रामध्ये गुरुवारी 110.92 दशलक्ष घनमीटर इतका एकूण साठा होता. त्यातील उपयुक्त साठा 79.78 दशलक्ष घनमीटर इतका आहे. टक्केवारीत हे प्रमाण 33.10 टक्के इतके आहे. धरण क्षेत्रात आत्तापर्यंत 163 मिलिमिटर पाऊस झाला आहे.

धरणात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी जुलै अखेर पाणी पुरू शकणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी दिली. तथापि, सध्या शहरामध्ये सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा सध्या तरी कायमच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.