कोल्हापूर- गेल्या 10 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत 51 हजार पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूरच्या पंचगंगेच्या महापुराची स्थिती कायम आहे. अनेक गावांना पुराचा वेढा बसलेला आहे.
दरम्यान, या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत.
तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.