दोन दिवसांत सुमारे 38 रुग्णांची वाढ
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे. रविवारी (दि. 2) आणि सोमवार (दि. 3) मिळून दोन दिवसांत सुमारे 38 रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
पिंपळगाव तर्फे घोडे 7, गावडेवाडी 4, शिनोली 2, घोडेगांव 11, अवसरी खुर्द 2, काळेवाडी दरेकरवाडी 2, काठापूर 1, पारगांव 1, थुगांव 1, मंचर 4, धामणी 1, जवळे 1, गंगापूर बुद्रुक 1 आणि पेठ 1 असे 38 रुग्ण एकाच दिवसात आढळले असून तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 324 झाली आहे. 203 रुग्ण बरे झाले आहेत. पाच मयत असून 109 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.
नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे. गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले, ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांत बाहेर गावावरून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील नागरिक घरात थांबणार असून, बाहेर गावावरून गावात कोणीही येऊ नये. रस्ते आणि परिसराची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून स्वच्छता केली जात असल्याची माहिती घोडेगांवच्या सरपंच क्रांती गाढवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी दिली.