करोना स्वॅब टेस्ट 3 हजारांनी केल्या कमी
पुणे – मागील चोवीस तासांत 3 हजार 226 नवीन रुग्ण आढळले असून, 3 हजार 268 रुग्ण बरे झाले आहेत. तर पुण्यातील 19 जणांसह 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी नवीन करोना बाधितांपेक्षा करोनातून बरे झालेल्याची संख्या जास्त आहे.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 32 हजार 806 असून, त्यापैकी 725 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 2 लाख 64 हजार 885 झाली असून, त्यापैकी 2 लाख 26 हजार 809 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 5 हजार 270 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 13 हजार 436 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. मागील आठवड्यापेक्षा टेस्टची सरासरी संख्या साधारण तीन हजारांनी कमी आहे.
सध्या महापालिकेकडे 3 हजार 200 बेड आहेत. मागीलवर्षी महापालिकेने खाजगी रुग्णालयांचे 50 टक्के बेड ताब्यात घेतले होते. त्यावेळी ती संख्या 5 हजार 200 च्या आसपास होती. 80 टक्के बेड ताब्यात घेतल्यास ही संख्या सात हजारांपर्यंत वाढू शकेल. यासोबतच बालेवाडी येथे पुन्हा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.