नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायत, श्री शिवस्मारक समिती आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वारुळवाडी (ता.जुन्नर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 320 रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली.
आरोग्य तपासणी शिबिरात कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती, हृदयरोग, मूत्ररोग, रक्तदाब, मधुमेह, नेत्र, मोती बिंदू शस्त्रक्रिया आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी प्रयोग शाळा समन्वयक मंगेश साळवे, तपासणी तज्ञ सपना बेलवटे, फिजोओथेरपी डॉ.दीक्षा वारुळे, डॉ.अमेय डोके यांचे सहकार्य लाभले.
डिसेंट फाउंडेशन पुणे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी जुन्नर तालुक्यात कॅन्सर व इतर आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आरोग्य तपासणी शिबिरांचा उपक्रम राबविणे समाज हिताचे असल्याचे नमूद केले.
मानवी जीवनात शिक्षण व आरोग्य महत्वाच्या बाबी आहेत. सध्याचे युग स्पर्धेचे व ताणताणावाचे असल्याने ज्येष्ठांनी, महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
यावेळी शंकर आय हॉस्पिटल पनवेलचे डॉ. प्रकाश पाटील, सरपंच राजेंद्र मेहेर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरज वाजगे, ग्रामपंचायत सदस्या ज्योती संते, रामभाऊ सातपुते आदी मान्यवरांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ, देवेंद्र बनकर, प्रकाश भालेकर, सदस्या स्नेहल कांकरिया, वैशाली मेहेर, मीना वारुळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, संचालक डिसेंट फाउंडेशन आदिनाथ चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे उपस्थित होते. प्रास्ताविक धनेश वारुळे यांनी तर जुबेर शेख यांनी आभार मानले.